“काम सोडा किंवा जागा सोडा” अशा कठीण पर्यायाचा सामना करावा लागला तेव्हा अंजना घोडके यांनी कामाऐवजी जागा सोडणे पसंत केले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या या संकटात जेव्हा आपल्यासारखे अनेक जण घरातून बाहेर पडण्यासही घाबरतात आणि ज्यांना “वर्क फ्रॉम होम” (घरातून काम) करण्याचे पर्यायदेखील उपलब्ध असतात, त्याच वेळी अंजना सारखी महिला मात्र शहर व परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता तिच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी व जे काम “घराबाहेर” जाऊनच करता येते त्या कामासाठी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते!!
उरळी देवाचीच्या सीमेवर राहणाऱ्या अंजनाला तिच्या कामावर येण्याकरिता नेहमीच लांबचा प्रवास करून यावे लागते. स्वच्छ ची सभासद या नात्याने तिच्यावर हिंगणे मळा या हडपसर मधील वस्तीतील ३५० घरांचा कचरा उचलण्याची व त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदरी आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर निर्माण झालेल्या अनिश्चित वातावरणात व वेळोवेळी जाहीर होणाऱ्या संचारबंदी, वाहनबंदी च्या काळात देखील ती तिच्या कामाच्या ठिकाणी पोहोचत होती, त्याकरिता प्रवासावर वेळप्रसंगी रु.१००/- एवढा खर्चदेखील करत होती, आणि तिचे काम किती महत्वाचे आहे हे तिला हटकणाऱ्या अधिकाऱ्यांना पटवूनही देत होती. ज्यांचा कचरा ती गोळा करत होती ते लोक तिने तिचे काम थांबवू नये अशी विनंती करत होते कारण त्याशिवाय त्यांच्या परिसरात कचरा साचून त्यांचा परिसर व आरोग्य अधिकच धोक्यात आले असते. “परिस्थिती कठीण होती, पण एकदा तुम्ही एखादे काम अंगावर घेतले की ते असे सोडून देता येत नाही. मी धोका पत्करायला तयार होते, पण माझे शेजारी पाजारी घाबरले होते आणि अखेर घरमालकांनी मला एकतर काम सोडा किंवा घर सोडा असा पर्याय दिला. मी घर सोडण्याचे ठरवले,” अंजना म्हणते.
सर्व सामान हलवण्याकरिता वाहन मिळणेही शक्य नसल्याने काही जरुरीपुरते सामान घेऊन तिने राहत्या घराला कुलूप लावले व ती बाहेर पडली. आपल्या कामाच्या ठिकाणाहून जवळ असलेली नवीन जागा शोधली आणि नेहमीप्रमाणे कामावर रुजूदेखील झाली. “बाकी काही पर्यायच नव्हता आणि आता मला दोन जागांचं भाडं भरावं लागत आहे, पण हे काही महिन्यांकरिताच करावं लागेल अशी मी आशा करते,” ती म्हणते.
५७ वर्षीय अंजनाने आजवर स्वतःचे आयुष्य, मुले किंवा अन्य कोणाच्याही मदतीशिवाय, स्वतःच्या कष्टानेच उभे केले आहे. भेदभावाचा अनुभव तिने आजवर अनेक वेळा घेतला आहे. “मला शक्य असेल तेवढे दिवस मी काम करतच राहीन. माझ्या कामाचे महत्व मी जाणून आहे, विशेषतः आताच्या परिस्थितीमध्ये. कचऱ्याच्या कामाला बदली माणूस मिळणं हे एरवीच्या काळात सुद्धा सहज शक्य होत नाही. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना अधिक जोखमीला सामोरे जावे लागत असल्याने आमच्या आजूबाजूच्या लोकांना भीती वाटते. आम्ही आवश्यक ती सर्व काळजी घेतोच पण त्यांना वाटणारी भीतीदेखील मी समजू शकते. पण काम कसे सोडणार?” अंजना सहजपणे म्हणते.
स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अंजना व तिच्यासारख्या इतरांना आपण किमान घराच्या बाहेर न पडण्याचा समजूतदारपणा दाखवून सहकार्य करू शकतो. तुम्ही आणखी कोणत्या प्रकारे मदत करू शकाल हे जाणून घेण्याकरिता कृपया खालील मदत क्रमांकावर संपर्क करावा:
९७६५९९९५००