Skip to main content
Stories

गोष्टी फील्ड मधल्या – कोरोनाशी सामना करताना

By 17th April 2020June 26th, 2020No Comments

SWaCH has a field staff that liaises with citizens, waste picker members, PMC and institutions. This is a day in the life of one such brave coordinator who is out on the frontlines in the battle against Corona alongside the waste pickers.

कोंढवा भागातील प्रभाग ३८/अ येथील सिद्धी रुग्णालयाजवळ फीडर पॉईंटवर (जेथे कचरा वेचक घराघरातून उचललेला कचरा महानगरपालिकेच्या ताब्यात देतात) साधारण ५ ते ७ ढकलगाड्या पार्क केल्या जातात. लॉकडाऊनमुळे पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू विकत घेणारी भंगार दुकाने बंद असल्याने मागील आठवड्याभरापासून, पुनर्वापरायोग्य असलेला आणि नसलेला कचरा मोठ्या प्रमाणात साठवला गेला, याचा जवळच्या नागरिकांना त्रास होऊ लागला. कचर्‍याच्या ढीगाच्या भितीने बरेच लोक फीडर पॉईंटवर आले आणि त्यांनी आम्हाला कचरा साफ करण्यास सांगितले अथवा ते कचरा जाळून टाकतील म्हणाले. माझी सहकारी शुभांगी, प्रभाग समन्वयक आणि मी त्यांना संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली की वाहतुकीवरील निर्बंधामुळे, भंगार दुकाने बंद झाल्यामुळे आणि यंत्रणा पूर्ण प्रमाणात काम करत नसल्याने असे घडत आहे, परंतु त्याकडे लक्ष दिले नाही. आम्हाला अधिक वेळ द्यावा यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि लगेचच कामाला लागलो. त्या परिसरातील काही सोसायट्यांशी बोललो आणि त्यांना ढकलगाड्या पार्क करण्यासाठी आम्हाला जागा देण्याविषयी विचारले. वेळेचं गांभीर्य आणि कामाचं स्वरूप लक्षात घेऊन सोसायट्यांनी लगेचच परवानगी दिली. नंतर बरेचसे फोन करून व समन्वय साधल्यानंतर पीएमसीच्या वाहनांनी / ट्रकनी कचरा उचलला. दिवसभर काम केल्यामुळे आम्ही त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत कचऱ्याचा ढिगारा साफ करण्यात यशस्वी होऊ शकलो. आजूबाजूचे नागरिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी परत आले आणि रिकाम्या व स्वच्छ फीडर पॉइंट पाहून आनंदी पण तेवढेच आश्चर्यचकित देखील झाले. तक्रार केलेल्या दिवशीच हे काम पूर्ण होईल याची त्यांना अजिबात कल्पनाही नव्हती. आणि मग याचीच दाद म्हणून त्यांनी टाळ्या वाजवल्या, खूप वेळ टाळ्या वाजवल्या… त्या टाळ्या होत्या कचरा वेचकांसाठी, समन्वयकांसाठी आणि त्या दिवशी तेथे काम केलेल्या प्रत्येकासाठीच.. आमचे कचरा वेचक सभासद पाणावलेल्या डोळ्यांनी भारावून गेले, आणि आम्हालाही अश्रू आवरता आले नाहीत.

वैभव साबळे हे ‘स्वच्छ’ (कचरा व्यवस्थापन सहकारी संस्था) मध्ये प्रभाग समन्वयक म्हणून पुण्याच्या कोंढवा भागात कार्यरत आहेत. प्रभाग समन्वयक, कचरा वेचक, महानगरपालिका आणि नागरिक यांच्याशी समन्वय आणि संवाद साधून समस्यांचे निवारण करणे हे त्यांचं रोजचं काम. सतत फील्ड वर काम करणारे, वैभव सारखे अनेक तरुण, स्वच्छ संस्थेची कचरा व्यवस्थापन यंत्रणा अविरतपणे चालू ठेवण्यास मदत करतात.

करोनाच्या काळात फिल्डवर काम करताना नक्की काय वाटतं??
मनात सतत भीती असतेच, सर्व संरक्षणात्मक साधनं असूनही, लोकांपासून शक्य तितके जास्त अंतर पाळूनही, फिल्डवर असल्याने आणि बऱ्याच लांबून का होईना पण लोकांशी भेट होत असल्याने विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका नेहमीच असतो.

अशा परिस्थितही काम सुरु ठेवण्यासाठी कुठून ऊर्जा मिळते?? आमचं काम अत्यावश्यक सेवांमध्ये येतं ना.. आणि कचरा गोळा करून त्याचं नीट व्यवस्थापन करणे हे या काळात जास्त महत्वाचं आहे. वास्तविक आमचे कचरा वेचक हे खरे नायक आहेत जे इतक्या अडचणी असताना, लांब अंतरं पायी चालायचं असताना सुद्धा रोज कामावर येतात. आणि म्हणूनच त्यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनादेखील कामावर नियमित येण्यासाठी प्रवृत्त करायचं मी ठरवलंय.

कचरा वेचक बाराही महिने शहरातील आरोग्याचे संरक्षण करतात. त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास मदत करा ! मदत / आणि योगदानासाठी आम्हाला संपर्क करा.
हेल्पलाईन क्र : ९१ – ९७६५९९९५०० इमेल: swachcoop@gmail.com

Leave a Reply