कोरोना व्हायरसच्या काळातील कचरा व्यवस्थापन – कचरा वेचक कशा प्रकारे अनेक अडचणी असूनही शहराच्या आरोग्याचे रक्षण करतात?
शांता नाना शेंडगे यांनी आयुष्यभर कचरा पुनर्वापरामध्ये काम केले आहे आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालवला आहे. परंतु,आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना पैसे कमावताना अनेक अडचणी येत आहेत. “कचरा उचलणे, त्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर हे काम सोपे काम नाही परंतु यामुळे आपल्या दैनंदिन गरजा भागवल्या जातात व पोटाची खळगी भरली जाते. मी हि अशी परिस्थिती कधीच पाहिलेली नाही जिथे काहीच करता येत नाही. आम्ही आणि आमच्या सारखे लोक कसे ह्या सगळ्या परिस्थितीत तग धरून जगू शकणार आहेत हे देवच जाणे” शांता सांगतात.
कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाने सर्व देशभरात सर्वांचेच जीवन व्यथित केले आहे. आजूबाजूच्या बऱ्याच लोकांना रोजचं जेवण कसं मिळेल याची जरी चिंता असली तरी निदान पैसे देऊन ते उपलब्ध करून घेऊ शकतात. दररोज कचऱ्याच्या पुनर्वापरावर अवलंबून असलेल्या कचरा वेचकांसाठी त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी देखील पुरेसे पैसे नसतात. सध्याच्या काळात कचरा वर्गीकरण करणं आरोग्यास धोकादायक ठरू शकते आणि भंगार विक्रेतेही व्यवसायासाठी बंद आहेत त्यामुळे कचरा वेचकांना कुठलाच पर्याय नाहीये.
““आणखी एक मुद्दा म्हणजे आम्ही झोपडपट्टीमधला कचरा देखील गोळा करतो पण तिथे राहणाऱ्या लोकांकडे देखील सध्या काम नाही, त्यामुळे आमची महिन्याची फी ही त्यांच्यासाठी सध्या प्राधान्य नाही. महिनाभर काम प्रामाणिकपणे पूर्ण करून देखील आम्हाला त्याचे पैसे मिळतील अशी आशा नाही.” शांता म्हणतात. स्वच्छ चे समन्वयक लोकांना फी देण्याची विनंती करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्याचा काही उपयोग होत नाहीये.
“दुकाने आणि हॉटेलसुद्धा बंद झाल्यामुळे आम्हाला कामामध्ये थोडा अराम आहे, परंतु याचा अर्थ असाही होतो की ही दुकाने आणि हॉटेल्स व्यवसायासाठी नियमीत सुरु होईपर्यंत आम्हाला आमच्या फीची भरण्याची वाट पहावी लागणार आहे. काही ठिकाणी तर घर मालकांनी त्यांची घरे देखील बंद ठेवली आहेत आणि दुसरीकडे राहायला गेले आहेत आणि ते परत कधी येतील हे आम्हाला ठाऊक नाही. तोपर्यंत आम्ही काय करणार?” सुमन देवीदास जाधव ज्या घरांसह काही व्यावसायिक आस्थापनांमध्ये सेवा देतात त्यांना हा विचार सतावतो.
‘स्वच्छ’च्या काही सभासदांना बिल्डिंग/घरांच्या गेटवरून किंवा मध्यवर्ती ठिकाणी कचरा गोळा करण्याचे काम आहे जेणेकरून त्यांना कचरा संकलनासाठी घरोघरी जावे लागू नये. वाहतुकीच्या अभावामुळे सभासदांना सुरुवातीला काळात काही ठिकाणी पोहोचण्यास अडथळा येत होता. आजही, ‘स्वच्छ’चे अधिकृत पत्र आणि ओळखपत्र इत्यादि असूनही अनेकांना सहजपणे इंधन मिळू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अडचण येतात. तरीही, सर्व अडथळ्यांना न जुमानता, बहुतेक कचरा वेचक शहर दररोज शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत आहेत.
‘स्वच्छ’ सभासदांना सक्षम करण्यासाठी विविध चांगल्या सवयी आणि कामाच्या दरम्यान काय खबरदारी घ्यावी यासंबंधीची प्रशिक्षणे देत आहे व सदस्यांना पीपीई अर्थात स्वसरंक्षक साधनांचे वाटप देखील करण्यात आले आहे. नागरिकांनाही कचरा वेगळा करण्यास सांगितले जात आहे तसेच ज्या व्यक्ती घरातच अलगीकरण अर्थात होम क्वारंटाईन आहेत त्यांना थेट पीएमसीतर्फे कचरा उचलण्याची सेवा दिली जात आहे, जेणेकरून कचरा वेचकांना कमी धोका होईल आणि कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मदत होईल. कचरा वेचकांच्या कामाच्या ठिकाणी असलेले नळ हात धुण्यासाठी उपलब्ध व्हावेत अशी विनंती केली आहे व सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर्स देखील उपलब्ध करून दिले आहेत.
“प्रत्येकाकडून मिळालेली थोडी मदत, समजूतदारपणा हे सगळं संकट स्वीकारून पुढे जाण्यास मदत करेल,” असे ‘स्वच्छ’च्या अध्यक्ष सुमन मोरे म्हणतात. “जर नागरिकांनी पाठिंबा दिला तरच आम्ही ही लढाई लढू शकतो. भुकेल्या पोटावर कधीही कोणतीच लढाई जिंता आली नाही आणि आम्हालादेखील अशी आशा आहे की आम्हाला तसे करण्याची वेळ येणार नाही.”
स्वच्छच्या कचरा वेचकांना पाठिंबा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आपण ९७६५९९९५०० वर संपर्क साधू शकता किंवा www.swachcoop.com वेबसाइटला भेट देऊ शकता.